लोकांच्या तोंडाकडे आशाळभूतपणे पाहण्याचा खटाटोप ताबोडतोब बंद कर. आपल्या आतल्या घालमेलीची उत्तरे आपल्या बाहेर असलेल्या जगाकडे असू शकत नाहीत. कलाकार फक्त पोरका असू शकतो. धरण्यासाठी एखादं बोट शोधात राहणारा जीव कलाकार बनूही शकत नाही. असं एखादं बापाचं उबदार बोट आपल्यासाठी नसतं. ही खूणगाठ तू तुझ्यात कलेचं बीज असेल तर स्वतःशी मारायला हवी.
– लेखक कवी रेनर मारिया रिल्के.
भवतालच्या भोगवादी कोलाहलात जेव्हा मन असहाय बनते तेव्हा मी रिल्केची दहा पत्रे वाचतो. दरवेळी हे पुस्तक वाचताना एखाद्या जुन्या मित्राला भेटल्याचा निव्वळ आनंद देते. मनातली सारी जळमटे दूर करून एक लख्ख नवा प्रकाश बहाल करते. माझ्या वाचनात मराठीत सुनिता बाईंनी जी ए कुलकर्णींना पाठवलेली पत्रे किंवा वपु काळेंचा प्लेझर बॉक्स इतकेच लिखाण अशा पत्र संस्कृतीला जपणारे होते. रिल्के एक अॅस्ट्रोजर्मन कवी होता. त्याच्या जन्माच्या वेळीच त्याच्या आईवडिलांचा संसार मोडायला येऊन ठेपला होता. त्यामुळे मोठेपणी मनाशी कुरवाळत बसण्यासारखे प्रेमाचे कौटुंबिक असे क्षण दुर्दैवाने त्याच्या नशिबी आले नव्हते. विभक्त झालेल्या आई वडिलांच्या नात्याचे ओरखडे त्याच्या बालमनावर पडले होते. अशा वातावरणात त्याच्या शिक्षणाची वाताहात होणे साहजिकच होते. त्याच्यातील कवी असण्याची ओळख त्याला कॉलेजात गेल्यावरच पटली होती. पुढे त्याने जर्मन साहित्य आणि कलेच्या इतिहासाचा सखोलपणे अभ्यास केला. नंतर त्याने म्यूनिक कला नगरीत आपला तळ ठोकला. सतत अस्वस्थ असणाऱ्या रिल्केला मग भटकण्याची सवयच लागली. याच भटकंतीमध्ये तो कधी युरोपात असे तर कधी रशियात असे.
रिल्केने भाषेला एक नवा आयाम दिला. आपल्या मराठीत जसे ग्रेसची कविता वाचताना अनुभव येतो अगदी तसाच. त्यांची कविता वाचत असताना सुरवातीला दुर्बोध वाटत असली तरी कालांतराने तिचा भाव उलगडू लागतो. मग सुरु होतो एक आनंददायी सफर. आपण एकेक पान वाचत सुटावे आणि एका खोल डोहात एकेक पायरी खोल खोल उतरत जावे. इतका तो अनुपम सोहळा असतो. जगभर भ्रमंती करत असताना आपला आत्मशोध घेणे हेच रिल्केच्या आयुष्याचे ध्येय आहे असे दिसते. रिल्के सांगतो आत्मबोध हाच अस्तिववादाचा पाया आहे. प्रथम मी आहे मग सारे आहे. आपण आधी स्वतःला शोधायला हवे म्हणजे जगाचा शोध सहजसाध्य होईल. माणसाच्या आयुष्यात दु:ख असतात, अडचणी असतात अगदी जीवघेण्या वेदना सुद्धा असतात. यावर रिल्के म्हणतो ही सारी मनुष्याच्या प्रगतीची दारे असतात. अशा अनेक वेदनादायी प्रसंगांच्या पलीकडे माणसाला शाश्वत सुख मिळते.
एकदा एका मित्राने रिल्केला आपल्या कविता वाचायला पाठवल्या आणि त्याने त्याचे समीक्षण करावे असे सुचवले. यावर रिल्केने त्याला सांगितले, मला समीक्षा, टीका, चिकित्सा वगैरे गोष्टी आवडत नाही. अशी सारी उठाठेव निरर्थक वाटते.
कलेला कलाकाराचा स्वाद असतो.
आस्वादकाच्या जिव्हेवर तो सार्थ असतो.
उगाच चर्चा करून माणसे अर्क गाळण्याचा खटाटोप करतात पण त्यातून निव्वळ चोथा निघतो. असे परखड मत रिल्के व्यक्त करतो. त्याला वाटते अशा चर्चा नवोदितांना किंवा अगदी प्रस्थापितांना सुद्धा लिखाणाच्या मार्गावरून भटकायला भाग पाडू शकते. म्हणूनच माणसाने नेहमी कला वाचावी समीक्षा वाचण्याच्या भानगडीत पडू नये. कलाकाराच्या आत्म्याचा सुगंध त्याच्या कलाकृतीला बिलगून असतो. तो काही शाब्दिक विश्लेषणाचा विषय असता कामा नये.
रिल्के म्हणतो कला हा अनुभूतीचा प्रदेश असला पाहिजे. शब्दबंबाळ वर्णनाचा नव्हे.
तर कधी तो आपल्या मित्राला विचारतो, कलेच्या आविष्कारावर बंदी किंवा स्वतःचा मृत्यू. यापैकी अधिक सुसह्य काय असेल ? जर या प्रश्नाचे उत्तर नि:शंकपणे ‘मृत्यू’ असं येत असेल तर मग समजून जा की तुला तुझ्या आयुष्याचा मध्यबिंदू सापडला आहे.
अनेकदा कलाकार मंडळींना इतरांच्या अभिप्रायाची अपेक्षा असते. इथे रिल्के नमूद करतो. तू तुझ्या कला निर्मितीचा मनमुराद आनंद घे. इतरांना तुझ्या कलेबद्दल काय वाटते याची बिलकुल तमा बाळगू नकोस. अगदी भान हरपून त्या कलानिर्मितीचा आनंद घे. त्यातच कलाकारचे खरे सुख आहे.
अशा एकेक पत्रातून रिल्के आपल्याला उलगडत जातो. तो कधी कलेबद्दल बोलतो तर कधी आयुष्याचे तत्त्वज्ञान सांगतो. पण त्याची भाषा कुठेही जड कठीण वाटत नाही. तर आपलाच कोणीतरी मित्र आपल्याशी बोलतोय असे वाटते.
No comments:
Post a Comment